संसार दोघींचा
एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, असं म्हणतात. मात्र समई लावताना दोन वाती एकत्रच जाळाव्या लागतात. सासू-सुनेमधल्या पारंपरिक वादात मला शिरायचं नाही. कारण त्याविषयी आधी ब-याच जणांनी लिहून-बोलून झालंय. सासू-सून हे नातं केवळ भांडण्यासाठी आहे असा समज काहींनी जणू स्वत:च्या मनोरंजनासाठीच सर्वत्र पसरवून ठेवलाय. वास्तवात या अनोख्या नात्याचे अनेक पैलू आहेत. त्यांचे स्वतंत्र विचार आहेत आणि समस्याही आहेत. या नात्याला आता एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे.
एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, असं म्हणतात. मात्र समई लावताना दोन वाती एकत्रच जाळाव्या लागतात. सासू-सुनेमधल्या पारंपरिक वादात मला शिरायचं नाही. कारण त्याविषयी आधी ब-याच जणांनी लिहून-बोलून झालंय. सासू-सून हे नातं केवळ भांडण्यासाठी आहे असा समज काहींनी जणू स्वत:च्या मनोरंजनासाठीच सर्वत्र पसरवून ठेवलाय. वास्तवात या अनोख्या नात्याचे अनेक पैलू आहेत. त्यांचे स्वतंत्र विचार आहेत आणि समस्याही आहेत. या नात्याला आता एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे.
मायले माय म्हणता ओठांले ओठ भिडे।
चुलतीले काकी म्हणता अंतर किती पडे॥
जिजीला जिजी म्हणता झाला जिभेला निवारा।
सासूला सासू म्हणता गेला तोंडातून वारा॥
बहिणाबाईंच्या या ओळींचं वर्णन करताना सिंधुताई सपकाळ त्यांच्या आत्मचरित्रात ‘मी वनवासी’मध्ये लिहितात की, सासू-सुनांच्या नात्यामधला विस्तव हा आपल्या संस्कृतीला लागलेला शाप आहे का? याचं उत्तर वरच्या ओळींमधून बहिणाबाईंनी शोधलं आहे. पण प्रत्यक्षात मला मात्र वाटतं की, या अनोख्या नात्याच्या गुंत्याची उकल खुद्द परमेश्वराकडेही नसेल. हे नातं आहेच इतकं मजेशीर! सासू नसणा-यांना कदाचित सासूची किंमत कधीच कळणार नाही आणि सून नसणा-यांना तिच्या असण्यातली गंमत कधी लक्षात येणार नाही. खरंच, सासू-सुनेचं नातं जगावेगळंच असतं. सुरुवातीला कच्च्या कैरी इतकं आंबट असलं तरी काळाच्या मधुर पाकात मुरत जाऊन चविष्ट मोरंब्या इतकंच ते हवंहवंसं होतं. सासू-सून अशा द्विपात्री बहुअंकी नाटकाचा प्रेक्षक म्हणून आस्वाद घेणं मनोरंजक आहे, पण स्वत:वर जेव्हा त्यातली एक कुठलीही भूमिका पेलण्याची वेळ येते तेव्हा खरी कसोटी लागते. खरं तर दोन्ही भूमिका पेलण्याची वेळ जवळपास प्रत्येक स्त्रीवर येतेच, पण त्यातही सासूच्या भूमिकेचे दोन पैलू असतात म्हणजे; ‘ती’ची सासू आणि ‘त्या’ची सासू असे! पैकी सामान्यत: त्याची सासू अत्यंत हळवी, भित्री आणि सतत जावयाला संतुष्ट ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारी असते, तर तिची सासू निर्धारी, काहीशी अहंकारी आणि सुनेला सतत पाण्यात पाहणारी असते, असा सर्वमान्य समज आहे. पण हा काही नियम नाही. मग सासू किंवा सून बनताना मन पूर्वग्रहदूषित करून आपली भूमिका ठरवून टाकण्यापेक्षा आधी एकमेकींना थोडा वेळ देऊन, पारखून मग आपल्या वागण्याचा रोख ठरवायला काय हरकत आहे?
मी सासू आहे म्हणून दुष्टच वागलं पाहिजे आणि मी सून आहे म्हणून खाष्टच वागायला हवं असं काही कुठे लिहिलेलं नाही. हो, स्त्रियांच्या आयुष्यातील विभाज्य घटक असलेल्या टीव्हीवरच्या दैनंदिन मालिकांनी मात्र स्वत:चं मीटर धावतं ठेवण्यासाठी हा नियम आपल्यावर जणू लादूनच टाकलाय.
पूर्वीच्या काळी नकळत्या कोवळ्या वयात मुलींची लग्नं व्हायची. भातुकलीच्या खेळात रमलेल्या त्या लेकींना घर-संसाराच्या रहाटगाडय़ाची कल्पनाही नसायची. अशा वेळी घरातली सारी कामं, पाहुण्यांची उठबस, बाजारहाट, धुणी-भांडी असं बरंच काही या नवविवाहितांना शिकवण्याची, समजावण्याची जबाबदारी अर्थात सासूबाईंवर पडायची. मुलाचं चुकलं तर जसा मातेच्या कपाळी दोष जातो तसा सुनेचं चुकलं तरी दोष सासूलाच असे, मग सासू आपल्यावरचा दोष सुनेच्या माहेरावर लादून मोकळी होत असे. आपल्या लहान लेकरांना जितक्या सहजपणे रागावून, ओरडून एखादी गोष्ट आई समजावत असते, तशीच पण काहीशा अधिक कठोरतेने ती सुनेला समजावली जायची. त्यात मायासुद्धा असायचीच, कारण त्यामुळेच कालांतराने सुनेने सासूला ‘सासूबाई’ न म्हणता ‘आई’ म्हणण्याची किंवा घरातली मुलं ज्या नावाने हाक मारतात त्या नावाने (मम्मी, मम्मा, माई, आक्का) हाक मारण्याची पद्धत रुजली असावी.
मला कायम या एका नात्याविषयी प्रचंड कुतूहल वाटत असायचं. अनेकींच्या अनेक कथा-कहाण्या ऐकत,अनुभवत मीही मनाची तयारी करत होते. माझ्या नव-याने पहिल्याच भेटीत मला एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगितली होती, काहीही झालं तरी आई-बाबांना सोडून वेगळं राहण्याचा विषय कधीही काढायचा नाही. मी त्यावर संमतीदर्शक मान डोलावली खरी, पण पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा मला तेव्हा अंदाज नव्हता. सुदैवाने माझे सासू-सासरे आणि घरातली इतर माणसंही अगदी थोडय़ाच कालावधीत माझ्या जिव्हाळ्याची झाली आणि त्यांच्याशिवाय वेगळं राहण्याची कल्पनाही मनाला कधी शिवेल असं वाटत नाही. तशी वेळ कधी येऊही नये असं मनापासून वाटतं.
काही दिवसांपूर्वी ब-याच अवधीनंतर एक मैत्रीण ऑनलाइन भेटली. तिच्या लग्नाला आता जवळजवळ चार वर्ष उलटून गेली असतील. एक मूलही झालंय. माझी चौकशी करताना एकदम भावुक झाली आणि म्हणू लागली, ‘‘सासूसोबत राहणारेस? म्हणजे संसार सुखाचा अनुभव काही तुला मिळायचा नाही.’’ मी एकदम दचकले. म्हटलं ‘‘असं का म्हणतेस? अगं, माझा नवीन संसार आहे.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘तुझा कुठे तो तर तुझ्या सासूबाईंचा संसार आहे.’’ पुढे स्वत:चे अनुभव सांगताना ती म्हणाली, ‘‘आमच्याकडे बघ, लग्नाला चार वर्ष होऊन गेली, पण घरातला एकही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला नाही. अगदी कोणती भाजी करायची हेही नाही. स्वयंपाकघरातला माझा वावरही अगदी नावापुरताच असतो, कारण ते स्वयंपाकघर माझंसुद्धा आहे, असं मला कधी कुणी जाणवूच दिलं नाही. माझ्या आईने आवडीने मला रुखवतात दिलेल्या सगळ्या संसारोपयोगी वस्तू तशाच माळ्यावर पडून आहेत. असं वाटतं माझा स्वत:चा संसार असता तर किती हौसेने केलं असतं मी सगळं..’’ आणि पुढे बराच वेळ तिचं आपलं हे पुराण सुरू होतं. या संभाषणानंतर मी एकदम अंतर्मुख झाले.
खरं तर, यात पूर्णपणे सासूचा दोष नाही. काडी-काडी करून जमवलेला संसार अचानक एक दिवस नव्या स्त्रीच्या स्वाधीन करण्याचा मोठेपणा कुठल्याही स्त्रीच्या ठिकाणी असणं फार दुर्मीळ आहे. मग अशा वेळी सुनेनंच पुढाकार घेऊन, प्रसंगी संघर्ष करून आपला हक्क घरात प्रस्थापित करायला हवा. ज्या सासवांना सुनेला घरातला हक्क मुळी द्यायचाच नसेल त्यांनी निदान तिच्या संसार मार्गावर अडथळा तरी बनू नये, असं माझं प्रामाणिक मत आहे. माझ्या परिचयात अशी अनेक कुटुंब आहेत, ज्यांनी लग्नाआधीच मुलाच्या स्वतंत्र संसाराची सोय करून ठेवली होती. नाहीतर घरातल्या अतिसुरक्षित वातावरणात वाढल्याने चार टक्के-टोणपे खाऊन संसार करण्याची अक्कल कुठून यायची. फक्त मुलगा जवळ राहावा म्हणून नाइलाजाने सुनेला घरात सहन करणारी कुटुंबंही मी पाहिली आहेत, पण यात तिच्या असुरक्षित मनाची आणि संसारस्वप्नांची राखरांगोळीच होत असते आणि घरातलं वातावरणही कायम दूषित होत असतं. मनाने दूर राहून एका छताखाली राहण्यापेक्षा दूर राहून मनाने जवळ राहणंच शहाणपणाचं नाही का?
याउलट सासूवर वरचढ होऊन बसणा-या अनेक सुनाही आहेतच. नवीन घरात आल्या आल्या घराचं रूप पालटून टाकण्याच्या अट्टहासाला पेटून अगदी झपाझप घरातली सगळी सत्ता काबीज करू पाहणा-या सुनांचीही काही कमी नाही.
असं असलं तरी सासू-सुना वर्षानुवर्ष सुखा-समाधानाने एकत्र संसार करत असलेलीही अनेक कुटुंबं मी अगदी जवळून पहिली आहेत. गरज असते ती थोडं मोकळं होण्याची! माझं माझं करत एखाद्या गोष्टीला चिकटून राहण्यापेक्षा ‘आपलं’ म्हणून ती वाटून घेतली की प्रश्न आपोआप सुटतात. थोडीफार कुरबुर व्हायचीच. माहेरी असताना नाही का आपले आई-वडिलांसोबत मतभेद होत?
एकत्र राहायचंय अथवा नाही याचा एकदा निर्णय घेऊन मोकळं झालं तर ब-याच गोष्टी सुटसुटीत होतात. आमचं एकत्र राहायचं आधीच ठरलंय, त्यामुळे सध्या मी आणि माझ्या सासूबाई, अशी आम्हा दोघींची एकमेकींना समजावून घेण्याची जणू कार्यशाळाच सुरू आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्याचं मी खोल विश्लेषण मनातल्या मनात करत असते. त्या तसं करत नसतील कदाचित! कारण त्यांचा तो स्वभावच नाही. मी मात्र कुठल्याही छोटय़ा गोष्टीच्या वाक्याच्या खोलात शिरून, त्याचा मागमूस काढून मोकळी झालेली असते. त्या मात्र मोकळ्या मनाने प्रत्येकाशी बोलणार. घरी आलेल्या कुणालाही त्या रिकाम्या हाती जाऊ देणार नाहीत. ‘दिल्याने वाढतं’ असं त्यांचं ब्रीदवाक्य माझा त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढवतं. कधी त्यांचे विचार मला अगदी जुनाट वाटतात तर कधी त्या असं काहीतरी बोलून जातात की वाटतं एवढे आधुनिक विचार तर आपणही करत नाही. नुसते विचारच नाही तर कृतीतूनही त्या वेळोवेळी त्यांच्या मनाचा आधुनिकपणा दाखवून देतात.
त्यांच्या रूपात मला एक सहवाचकही सापडलाय. माझ्या व्यतिरिक्त घरात कुणीतरी माझी पुस्तकं आवडीने बघतं आणि सवडीने वाचतं हे पाहून मला आनंदच होतो. माझ्या कुठल्याही लेखाचं वाचन त्या अगदी आवर्जून करतात. माझं कुठल्याही बाबतीत कौतुक करत असताना हातचं राखून बोलताना मी त्यांना कधी पाहिलेलं नाही/फ. जे काही करणार ते अगदी मनापासून! स्वयंपाकघराबाबत मात्र त्या थोडय़ा आग्रही आहेत, पण मीसुद्धा मध्ये लुडबुड करून आपली संधी मिळवतेच! मी केलेल्या पदार्थाचंही त्या तितक्याच प्रामाणिकपणे परीक्षण करतात आणि मोकळेपणे प्रतिक्रियाही देतात. सुनेशी कसं वागायचंय हे त्यांना आणि सासूशी कसं वागायचं नाही हे मला पक्कं ठाऊक आहे. त्यामुळे आमच्यातल्या संभाषणात आणि वागण्यात सहजता दिसून येते.
त्यांच्या रूपात मला एक सहवाचकही सापडलाय. माझ्या व्यतिरिक्त घरात कुणीतरी माझी पुस्तकं आवडीने बघतं आणि सवडीने वाचतं हे पाहून मला आनंदच होतो. माझ्या कुठल्याही लेखाचं वाचन त्या अगदी आवर्जून करतात. माझं कुठल्याही बाबतीत कौतुक करत असताना हातचं राखून बोलताना मी त्यांना कधी पाहिलेलं नाही/फ. जे काही करणार ते अगदी मनापासून! स्वयंपाकघराबाबत मात्र त्या थोडय़ा आग्रही आहेत, पण मीसुद्धा मध्ये लुडबुड करून आपली संधी मिळवतेच! मी केलेल्या पदार्थाचंही त्या तितक्याच प्रामाणिकपणे परीक्षण करतात आणि मोकळेपणे प्रतिक्रियाही देतात. सुनेशी कसं वागायचंय हे त्यांना आणि सासूशी कसं वागायचं नाही हे मला पक्कं ठाऊक आहे. त्यामुळे आमच्यातल्या संभाषणात आणि वागण्यात सहजता दिसून येते.
हे सगळं इथे लिहिण्यामागे माझ्या सासूबाईंवर स्तुतिसुमनं उधळून त्यांच्याकडून कौतुक करून घेण्याचा माझा उद्देश नाही तर थोडासा समजूतदारपणा आणि संवादकौशल्य आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी सोप्या करू शकतं, हे सांगण्याचा आहे. माहेरी असते ती ‘आई’ आणि सासरी असते ती ‘सासू’ हा जुनाट आणि बिनबुडाचा समज आता नाहीसा व्हायला हवा. एकाच जन्मात आपल्याला दोन आईंची माया मिळणं भाग्याचंच मानलं पाहिजे. त्याचप्रमाणे घरात मुलगी असेल तर तिला बहीण म्हणून आपली सून घरात आली आहे आणि नसेल तर मुलगीच बनून घरात आली आहे, असा सकारात्मक विचार जर सासवांनी केला तर त्या टीव्ही मालिकावाल्यांच्या तोंडात मारून दोघींनाही सुखाने संसार करणं नक्की शक्य होईल.
तृप्ती एकबोटे-देवरूखकर

No comments:
Post a Comment