थोडं तुझं, थोडं माझं!
कुठल्याही लग्नाच्या नंतरचा काही काळ मुलीसाठी आणि त्या घरातल्या माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. जर या दिवसांमध्ये एकमेकांना समजून, सांभाळून घेतलं नाही तर पुढे त्याचे अप्रिय परिणाम होताना दिसतात. परक्या घरातून आलेली परकी मुलगी आपलीशी करण्यासाठी घरातल्यांनी आणि नवं घर आपलंसं करण्यासाठी मुलीने, अशा दोन्ही बाजूंनी प्रयत्न होणं आवश्यक असतं.
याबाबतीत अनेकदा मुलाला आणि सुनेला वेगवेगळे कायदे लागू झालेले मी पाहिले आहेत. म्हणजे मुलगा रात्री घरी कितीही वाजता आला तरी हरकत नाही पण सुनेला अर्धा तास उशीर झाला तरी त्याचा मोठा विषय अनेक ठिकाणी होतो. घरातली कामं करण्याबाबतही तसंच! माझा एक सहकारी तर पुरुषांनी घरातली कामं करण्याच्या पूर्ण विरोधात आहे आणि अशा मानसिकतेच्या अनेक व्यक्ती आपल्याला आसपास पाहायला मिळतात. खरं तर या गोष्टी आई-वडिलांनीच आपल्या मुलांना शिकवायच्या असतात. सहजीवन म्हणजे ‘तू कर, मी फक्त खातो’ असं होत नाही. माझ्या नव-याने लग्नाआधी जेव्हा मी घरातली सगळी कामं करतो असं मला सांगितलं तेव्हा खरं तर माझा अजिबात विश्वास बसला नव्हता पण आता मी हे खरंच अनुभवतेय. माझ्या घरातल्या किंवा बाहेरच्या कुठल्याही कामात त्याचा मदतीचा हात कायम पुढे असतो आणि मला या गोष्टीचा अभिमानही वाटतो आणि माझा त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढतो. आता, ‘‘या गोष्टी लग्न नवीन आहे म्हणून काही दिवसांपुरत्याच आहेत’’ असं मला अनेकांकडून सांगितलं जातं पण निदान त्याची कामात मदत करण्याची तयारी आहे, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे.

आपण आपल्याच तंद्रीत जगत असतो. घर, ऑफिस, मित्र-मैत्रिणी, शॉपिंग, सिनेमे, पिकनिक्स, पार्टीज असं सगळं नियमित सुरू असतं आणि एक दिवस ‘अचानक’ आपलं लग्न होतं. हो, लग्नाची तयारी कितीही दिवस सुरू असली तरी लग्न ‘अचानक’च झाल्यासारखंच वाटतं पण आपल्या आयुष्यात खूप मोठी उलाढाल झाली आहे हे लक्षात यायला मात्र थोडा वेळ लागतो. आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो तो आपल्या लग्नाचा दिवस येतो आणि निघूनही जातो पण खरी कसोटी सुरू होते त्यानंतर!
नव्या घरात जुळवून घेण्यासाठी कुणाला किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही. ते प्रत्येकाच्या स्वभावावरही अवलंबून आहे. लग्न ठरल्यानंतर काही दिवसांतच माझं मात्र इथल्या घरातल्या लोकांबरोबर चांगलंच ‘टयुनिंग’ झालं होतं. त्यामुळे मला इथे रुळायला तसा वेळ लागला नाही. पण फक्त घरातल्या माणसांसोबत सूर जुळून भागत नाही तर संपूर्ण राहणीमान जुळवून घ्यायचं असतं. भाजीच्या चवीपासून कपडय़ाच्या घडीपर्यंत सगळंच नवीन असतं. या नावीन्याचं अप्रूपही वाटत असतं आणि दडपणही येत असतं. माझं लग्न ठरल्यापासून मी आजूबाजूच्या लग्न झालेल्या स्त्रियांचं उगीच निरीक्षण करू लागले होते. त्या कशा वागतात, कसे कपडे घालतात, लग्नानंतरच्या अनुभवांबद्दल काय बोलतात वगरे पण त्यामुळे माझा संभ्रम अजून वाढत होता. कारण मला लग्न झाल्यानंतर आयुष्य आणखी सुंदर होतं, असं सांगणारं जवळजवळ कुणीच सापडलं नाही. प्रत्येक जण तक्रारींचा मोठा खजिनाच माझ्या समोर घेऊन येऊ लागला.
‘‘काही नाही गं, एकदा लग्न झालं की बाईचं स्वत:चं काही आयुष्य उरतंच नाही, येईल तुलासुद्धा अनुभव!’’ असं लग्नाला काही र्वष होऊन गेलेल्या माझ्या मैत्रिणींनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा तर मी पुरतीच हादरले. आपण लग्नाची घाई तर करत नाही ना, आपलं स्वत:साठीचं आयुष्यच संपून जाणार, अजून कितीतरी गोष्टी करायच्या बाकी आहेत, कुठून सुरुवात करू, लग्नाआधी काय काय करू अशा प्रश्नांनी मला भंडावून सोडलं होतं. माझी ही अवस्था पाहून माझ्या नव-याने मला विश्वास दिला की तुझ्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड मी कधीही येणार नाही. अनेकांना या फक्त बोलायच्या गोष्टी वाटतात पण गेल्या ६-७ महिन्यांत मी हे प्रत्यक्ष अनुभवलं आहे. खरं तर या बाबतीत सासरकडच्या लोकांना आणि नवीन सुनेला, दोघांनाही काही गोष्टींची जाणीव असणं फार गरजेचं आहे. मी लग्नाआधी जीन्स आणि टीशर्ट किंवा कुर्ती असे सुटसुटीत कपडे घालण्याला प्राधान्य देत होते पण लग्नानंतर माझी वेशभूषा थोडी तरी बदलणार यासाठी मी मनाची आधीच तयारी केली होती. लग्नानंतर काही दिवस साडय़ा, मग ड्रेसेस आणि आता ऑफिसमध्ये किंवा नव-यासोबत फिरायला जाताना मी सर्रास जीन्स वापरते. महत्त्वाचं म्हणजे त्यावर कुणी आक्षेप घेत नाही कारण मी देखील सवय नसताना साडय़ा आणि ड्रेसेस कटकट न करता घातले आणि आता मला त्याची सवयसुद्धा झाली आणि आवडूही लागलं आहे. याला तडजोड नाही म्हणता येणार तर हा दोन्ही बाजूंचा समजूतदारपणा आहे.
याबाबतीत अनेकदा मुलाला आणि सुनेला वेगवेगळे कायदे लागू झालेले मी पाहिले आहेत. म्हणजे मुलगा रात्री घरी कितीही वाजता आला तरी हरकत नाही पण सुनेला अर्धा तास उशीर झाला तरी त्याचा मोठा विषय अनेक ठिकाणी होतो. घरातली कामं करण्याबाबतही तसंच! माझा एक सहकारी तर पुरुषांनी घरातली कामं करण्याच्या पूर्ण विरोधात आहे आणि अशा मानसिकतेच्या अनेक व्यक्ती आपल्याला आसपास पाहायला मिळतात. खरं तर या गोष्टी आई-वडिलांनीच आपल्या मुलांना शिकवायच्या असतात. सहजीवन म्हणजे ‘तू कर, मी फक्त खातो’ असं होत नाही. माझ्या नव-याने लग्नाआधी जेव्हा मी घरातली सगळी कामं करतो असं मला सांगितलं तेव्हा खरं तर माझा अजिबात विश्वास बसला नव्हता पण आता मी हे खरंच अनुभवतेय. माझ्या घरातल्या किंवा बाहेरच्या कुठल्याही कामात त्याचा मदतीचा हात कायम पुढे असतो आणि मला या गोष्टीचा अभिमानही वाटतो आणि माझा त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढतो. आता, ‘‘या गोष्टी लग्न नवीन आहे म्हणून काही दिवसांपुरत्याच आहेत’’ असं मला अनेकांकडून सांगितलं जातं पण निदान त्याची कामात मदत करण्याची तयारी आहे, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे.
गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणून काही एका दिवसात लगेच मुलीची बाई होत नाही. काल-परवापर्यंत आई-वडिलांच्या घरात बिनधोकपणे कुठल्याही जबाबदारीशिवाय बागडणारी मुलगी जेव्हा संपूर्ण अनोळखी घरात कायमची येते तेव्हा एका दिवसात तिला सगळं काही येण्याची, तिचा स्वभाव, सवयी, आवडी-निवडी बदलण्याची अपेक्षा करणं योग्य नाही. तिला थोडा वेळ द्यायला हवा. ती पुढाकार घेऊन एखादी गोष्ट करत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. मुळात घरी आलेली सून ही आपल्या कुटुंबाचा भाग आहे, हेच अनेक लोक मान्य करत नाहीत. अनेकदा तिने उत्साहाने केलेल्या गोष्टींना किंवा पदार्थाना ‘‘आमच्याकडे हे असं नाही करत’’ असं म्हणून तिचा हिरमोड केला जातो. तिच्याकडून अजाणतेपणी झालेल्या लहान-सहान चुकांचाही मोठा विषय केला जातो. मग कालांतराने तिचा घरात काही करण्याचा उत्साहच मावळतो आणि मग सून घरात काही करतच नाही असा शिक्कामोर्तबही तिच्यावर केला जातो. मी हे माझ्या जवळच्या अनेक कुटुंबांमध्ये होताना पाहिलं आहे.
अनेकदा मुलीही हीच चूक करतात. मग ‘आमच्याकडे’ असं आणि ‘तुमच्याकडे’ तसं या वादात ही कुटुंब कायम अडकून पडतात आणि कालांतराने नात्यांमधली दरी रुंदावत जाते. जेवण, सणवार, व्रत-वैकल्यांच्या बाबतीत माहेरच्या पद्धतींना चिकटून राहण्यापेक्षा नवीन घरातल्या नवीन पद्धती शिकून त्या पुढे चालू ठेवणं केव्हाही इष्टच! मी आणि माझ्या नव-याने सुरुवातीपासूनच काही गोष्ट जाणीवपूर्वक टाळल्या आणि काही सवयी मुद्दाम लावून घेतल्या. जसं, आम्हा दोघांपैकी कुणीही ‘माझे’ किंवा ‘तुझे’ असा नातेवाइकांबद्दल, घराबद्दल, वस्तूंबद्दल उल्लेख केला की आम्ही लगेच एकमेकांना टोकतो. जे काही आहे ते ‘आपलं’ आहे आणि माझ्या अनुभवानुसार याचा खरंच आपल्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या मानसिकतेवर खूप सकारात्मक परिणाम होतो. खरं तर, लग्न म्हणजे नवरा-नवरीसोबत घरातल्या प्रत्येकासाठीच आयुष्याच्या एका नवीन पर्वाची सुरुवात असते, आईची सासू होत असते, वडिलांचे सासरे होत असतात तर बहिणीची नणंद होत असते. नात्यांमध्ये होणारे हे सगळे बदल ठरवलं तर खूप सुखदायी होऊ शकतात. एकमेकांकडचं चांगलं ते घेऊन, या नवीन पर्वाची सुरुवात केली तर सगळ्यांसाठीच गोष्टी सुकर होतात.
मी स्वत:ला माझ्या सासरच्या घरात एकरूप करण्यासाठी काही गोष्टी प्रयत्नपूर्वक करते. तसेच प्रयत्न मला सामावून घेण्यासाठी इथली माणसंही करताना दिसतात. या घरात रुळण्यासाठी आवश्यक वेळ इथल्या लोकांनी मला दिला आहे आणि मला त्यांच्यात एकरूप करून घेण्यासाठी मीही त्यांना तितकाच वेळ देत आहे आणि मला खात्री आहे की पुढे हा वेळच आमच्यातली नाती भक्कम करणारा दुवा ठरणार आहे.
तृप्ती एकबोटे-देवरुखकर
तृप्ती एकबोटे-देवरुखकर