Thursday, 23 January 2014

मराठीतले चेतन भगत कुठे आहेत?

मराठीतले चेतन भगत कुठे आहेत?

रस्त्याच्या कडेला असलेल्या पुस्तकविक्रेत्याकडील ढिगा-यात एखादं गाजणारं नवं मराठी पुस्तक सापडलंय? एखाद्या महाविद्यालयाच्या आवारात नव्या मराठी पुस्तकावर किंवा लेखकावर जोरदार चर्चा किंवा वाद झडताना बघितलाय? पटकन दहा तरुण मराठी लेखकांची नावं सांगा, असं म्हटल्यावर कुणाची नावं आठवतात?

नुकतीच एका कार्यक्रमात दुर्जोय दत्ता नामक तरुण लेखकाशी ओळख झाली. वयाच्या केवळ २६व्या वर्षी तब्बल आठ सर्वाधिक खपाच्या (बेस्ट सेलर) इंग्रजी पुस्तकांचा लेखक म्हणून तो नावारूपाला आलाय आणि त्याचं नववं पुस्तक हाँगकाँग पर्यटन मंत्रालयाने त्याला त्यांच्या देशात आमंत्रित करून लिहून घेतलं आहे. अनेक नामवंत व्यासपीठांवर त्याला ‘यंग अचिव्हर’ म्हणून सन्मान मिळाला आहे. स्वत: तरुणांचा प्रतिनिधी असलेल्या दुर्जोयने विशेषत: महाविद्यालयीन वयोगटातल्या मुला-मुलींना आवडतील अशा नावांची आणि तशाच विषयांची पुस्तकं लिहिली, काहीशी घाबरतच वाचकांसमोर आणली आणि आज त्याचा स्वत:चा वाचकवर्ग निर्माण झाला आहे.
दुर्जोयशी झालेली चर्चा मनात ताजी असतानाच चर्चगेट स्टेशनबाहेर रस्त्यावरील विक्रेत्यांकडची पुस्तकं मला नेहमीप्रमाणे खुणावत होती. रंगीबेरंगी मुखपृष्ठांच्या आकर्षक नावांच्या ढिगाने ठेवलेल्या पुस्तकांच्या खजिन्यात अनेक इंग्रजी नवलेखकांची पुस्तकं दिसत होती. पण एखाद्या नवीन मराठी लेखकाचं पुस्तक मला दिसत नव्हतं. तशी पानिपत, ययाति, संभाजी अशी मराठीतली काही गाजलेली पुस्तकं तिथे एका कोप-यात ठेवलेली दिसत होती. पण माझी नजर शोधत होती, एखाद्या तरुण मराठी लेखकाच्या पुस्तकाला!
या अनुषंगाने मनात अनेक प्रश्न उमटले. मराठी तरुण लेखक काही लिहितात की नाहीत आणि ते लिहीत असतील तर वाचकांपर्यंत कितपत पोहोचतंय. फेसबुक आणि ब्लॉग्जवरच्या पोस्ट्स म्हणजेच तरुणांचं मराठीत ‘साहित्य’ आहे का? वाचकांची धडाकेबाज पसंती मिळावी, असं काही त्यांच्याकडून लिहूनच होत नाही का? एकामागोमाग हिट पुस्तकं लिहू शकतील, असे (इंग्रजीसारखे) तरुण लेखक मराठीत का नाहीत?
मराठीत लिखाणच होत नाही, असा मुद्दा नाहीये, तर मराठीत तरुणांसाठी तरुणांनी लिहिलेलं लिखाण करण्याची इच्छाशक्तीच दिसून येत नाही. लेखकांपेक्षा कवींचाच सुळसुळाट अधिक दिसतो आणि जे काही गद्यलेखन होतं ते वाचकांपर्यंत पोहोचतच नाही, अशी परिस्थिती आहे. शिक्षणाचं माध्यम इंग्रजी असल्यामुळे प्रत्येक वेळी ‘मराठीत लिहिणार कोण आणि वाचणार कोण’, असा प्रश्न करणा-यांनी, इंग्रजीत लिहिणारी तरी किती मराठी मुलं आहेत हेही तपासून पाहायला हवं. कितीशा इंग्रजी पुस्तकांवर मराठी लेखकांची नावं झळकताना दिसतात? किती मराठी पुस्तकांचे इतर भाषांमध्ये अनुवाद होतात? याउलट मराठीमध्ये इतर भाषांतून अनुवादित केलेल्या पुस्तकांच्या राशी दिसतात.
याबाबत मराठी चित्रपटांचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवायला हरकत नाही. काही वर्षापूर्वी मराठी तरुणांनी मराठी सिनेमाकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती. पण अनेक नवीन प्रयोग झाल्याने तरुण पुन्हा मराठी सिनेमाकडे वळले. मराठी साहित्यसृष्टीनेही तरुणांना मराठीत लिहिण्यासाठी असंच प्रेरित करण्याची आवश्यकता आहे. पण आपल्याकडे अनेकदा तरुणांच्या लेखनाला नावं ठेवण्याचेच प्रकार अधिक दिसतात. खरं तर मराठी तरुणांकडे प्रतिभेचा अभाव मुळीच नाही, पण आपण वेळोवेळी फेसबुकच्या भिंतीवर जे काही खरडतो तेच मराठी लेखनाचं भवितव्य आहे, असा त्यांचा गैरसमज झालेला दिसतो. त्यातूनही कुणी जिद्दीने पुस्तक लिहिलंच तरी ते प्रकाशित करण्यासाठी मोठया दिव्यातून जावं लागतं. ‘वाफाळलेले दिवस’ या खूप वेगळ्या विषयावरच्या पुस्तकाचे तरुण लेखक प्रतीक पुरी याविषयी सांगतात, ‘पुस्तकाचं लिखाण झालं तरी ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रकाशक आणि वितरक अशा दोन महत्त्वाच्या टप्प्यांमधून जावं लागतं. आपल्याकडे नेमका हाच दुवा कमकुवत आहे. पुस्तक छापून घेण्यासाठी बरेचदा प्रकाशकांशी ओळख किंवा त्यांच्याकडे वशिला असावा लागतो. तसंच लेखकाने स्वत:च्या खिशात हात घालावा, अशीही अपेक्षा असते. त्यामुळे अनेकदा नवोदित लेखकांसाठी संभ्रमाची स्थिती निर्माण होते. प्रत्येक वेळी लेखक स्वत: खर्च करण्याच्या परिस्थितीत असेलच असं नाही, त्यामुळे अनेकदा पुस्तक प्रकाशित करण्यापासून तरुण लेखक परावृत्त होतात. नवीन प्रकाशकासोबत काम करायचं तर त्याचं वितरण कमकुवत असतं. आर्थिक कमकुवतपणा आणि जाहिरात किंवा पुस्तकाच्या प्रसिद्धीचा अभाव हे नवीन मराठी लेखक तयारा न होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे.’
खरं तर, हे एक दुष्टचक्र आहे. लिहिलेलं वाचकांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे त्याबद्दल जागृतीच निर्माण होत नाही. अर्थात, त्यामुळे मागणी नसते आणि मागणी नाही म्हणून लिखाण खुंटतं. म्हणजे लेखक कायम ‘चांगलं वाचणारेच नाहीयेत’ आणि वाचक कायम ‘चांगलं लिहिणारेच नाहीयेत’ अशी बोंबाबोंब करत राहतात.
इंग्रजी पुस्तकांसाठीची बाजारपेठ मोठी आहे, कारण इंग्रजी वाचणारे अधिक आहेत हे मान्य. पण मराठी पुस्तकं वाचायची इच्छा असलेली तरुण पिढीच अस्तित्वात नाही, हे सपशेल खोटं आहे. कारण ‘नटरंग’, ‘शाळा’, ‘दुनियादारी’, ७२ मैल’ असे मराठी सिनेमे यशस्वी झाले, तेव्हा हे सिनेमे ज्या कादंब-यांवर बेतलेले आहेत, त्या पुस्तकांची मागणी अचानक वाढली आणि ती तरुण वर्गाकडून होताना दिसते. याचा अर्थ पुस्तकं वाचण्याची इच्छा तरुण मराठी मुलांनाही प्रचंड आहे, पण त्यांना पुस्तकांची माहिती आणि उपलब्धता नाही. कारण मराठी पुस्तकं प्रसिद्धी आणि वितरण या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मागे पडतायत.
अर्थात, काही जण एवढा नकारात्मक विचार न करता मराठी लेखक ‘टेक-सॅव्ही’ होऊ लागले आहेत. ते ब्लॉग्ज लिहितात, फेसबुक खरडतात हेही नसे थोडके, असा विचार करतात. पण हा टेक-सॅव्हीपणा म्हणजे एक प्रकारची बंडखोरी आहे. पूर्वी आपण लिहिलेलं छापून यावं, यासाठी जोडे झिजवणारा लेखक आज स्वत:चा मजकूर ब्लॉग्ज किंवा फेसबुकवर टाकून मोकळा होतो. पण लेखक आधुनिक झाला असला तरी वाचक तसा झाला आहे का? सरसकट सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन आणि टॅब आले आहेत का? ..आणि आले असले तरी त्यावर ई-बुक्स आणि ब्लॉग्ज वाचण्याला कितीसे लोक, विशेषत: कितीसे तरुण प्राधान्य देतात? हे ब्लॉग्ज आणि मोठया पोस्ट्स वाचणा-यांची संख्या अत्यंत नगण्य आहे. अगदीच तुलना करायची झाली तर फक्त मराठीतलाच लेखक तांत्रिकदृष्टया सक्षम झाला आहे का, असाही प्रश्न आहे.
याचा अर्थ इंग्रजी लेखक अजून मागासलेले आहेत, की त्यांना वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आजही पुस्तकं लिहावी लागतात, असा होतो, पण तसं नाही. बाजारात कितीही शीतपेयं आली तरी ती पाण्याची जागा घेऊ शकत नाहीत. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी आपल्या आयुष्यातलं पुस्तकांचं महत्त्व कमी होऊ शकत नाही. किंबहुना छापील जगाकडून आधुनिक किंवा डिजिटल विश्वाकडे प्रवास करताना पुस्तकं मागे सोडायची की नाही, हा संपूर्णत: आपला निर्णय असणार आहे. ..आणि नावीन्य केवळ माध्यमांमध्येच नाही तर लिखाणातही यायला हवं, हे समजणं गरजेचं आहे. नाहीतर फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्ज अशी माध्यमं नवी, पण त्यावर टाकल्या जाणा-या मजकुराची भाषा इंटेलेक्च्युअल पठडीतली, तरुण वाचकांच्या डोक्यावरून जाणारी असली तर या आधुनिक माध्यमांचा काय उपयोग? दुर्जोयच्या मते, ‘प्रमाण आणि समजायला अवघड भाषेत लिहिलेलं म्हणजेच चांगलं लिखाण असं समजणं मूर्खपणाचं आहे. जे जास्तीत जास्त वाचकांच्या मनापर्यंत सहजतेने पोहोचतं, तेच खरं तर उत्तम लिखाण!’
लेखक आणि समीक्षक सतीश तांबे यासंदर्भात म्हणतात, ‘‘आपल्याकडे नव्याची आसच दिसत नाही. वेगळे आणि नवे प्रयोग उचलून धरले जात नाहीत. परंपरा आणि रूढींच्या नावाखाली जुनंच कुरवाळत बसण्याच्या आपल्या मानसिकतेमुळेच नवीन लिखाण फारसं दिसत नाही. मग चेतन भगतला तरुणांनी डोक्यावर घेतलं, तर पोटशूळ उठण्याचं कारणच नाही. कारण तो नवीन प्रयत्न तरी करतोय. दुर्दैवाने आज मराठीतला चेतन भगत कोण, असा प्रश्न विचारला तर एकही नाव समोर येत नाही. कारण आपल्याकडे प्रयोग स्वीकारलेच जात नाहीत. काळानुरूप भाषेत आणि लेखनशैलीत बदल व्हायलाच हवेत, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे.’’
एक चांगला वाचक तयार होण्याची प्रक्रिया खरं तर वाचता येऊ लागण्यापासूनच सुरू होते. आधी लहान मुलांसाठीची, मग माहितीपर, प्रेरणात्मक पुस्तकं अशी ही प्रक्रिया पुढे जात राहते. पण काय वाचायचं, हे स्वत: ठरवण्याच्या वयात आलेल्या तरुणांमध्ये इंग्रजीतल्या प्रेमकथांव्यतिरिक्त आपल्या भाषेत बरंच काही वाचण्यासारखं आहे याची जाणीवच नसते. काही महिन्यांप्रू्वी ऐश्वर्य पाटकर या तरुण लेखकाला त्याच्या ‘भुईशास्त्र’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, पण आज कुठल्याही महाविद्यालयाच्या आवारात फेरी मारून या लेखकाबद्दल विचारलं तर किती मराठी तरुणांना हे नाव माहीत असेल, याबाबत शंकाच आहे.
‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’ या स्वखर्चाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे तरुण लेखक अवधूत डोंगरे एकंदरीतच या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करताना म्हणतात, ‘‘आपल्या करोडो मराठी भाषिकांच्या प्रदेशात मराठी पुस्तकांची आवृत्ती केवळ हजार प्रतींची निघते, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचतच नाहीत, तर त्यातले प्रयोग विचारात घेणं आणि स्वीकारणं किंवा नाकारणं ही तर दूरची गोष्ट आहे. इंग्रजी पुस्तकांच्या प्रकाशकांकडे पाहायला मिळणारी व्यावसायिकता आपल्याकडे नावालाही मिळत नाही. आपल्याकडे प्रकाशनाचा वडिलोपार्जित व्यवसाय किराणा मालाच्या दुकानासारखा चालवला जातो. मराठी पुस्तकांच्या या परिस्थितीला केवळ प्रकाशक आणि वितरकच जबाबदार नाहीत, तर माध्यमं आणि वाचकांची आर्थिकदृष्टया संकुचित मनोवृत्तीही तेवढीच जबाबदार आहे.’’
आपल्याकडे फुकटात पुस्तकं मिळवून वाचण्याची वृत्ती इतकी खोलवर रुजलेली आहे, की विकत घेऊन पुस्तकं वाचणारे किंवा पाठपुरावा करून ती मिळवणारे, ऑनलाइन मागवणारे वाचक फार कमी दिसतात. कुठल्याही मराठी वृत्तपत्रात चित्रपटांप्रमाणे पुस्तकांसाठी वेगळ्या पुरवण्या दिसत नाहीत, पुस्तक परीक्षण कशा पद्धतीने होतं, हा तर निराळा चर्चेचा विषय आहे. आज एकाही मराठी वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर पुस्तकांसाठी वेगळा विभाग दिसत नाही. याउलट पुन्हा एकदा तुलनाच करायची झाली, तर बहुतेक सगळ्याच इंग्रजी वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवर पुस्तकांसाठी विशेष विभाग असल्याचं दिसतं. मराठी वृत्तवाहिन्या पुस्तकांवर चर्चा, नवीन पुस्तकांची माहिती देणारे, नवीन लेखकांना समोर आणणारे कार्यक्रम करताना दिसत नाहीत. खरं तर या माध्यमांचा प्रभावी वापर करून नवीन पुस्तकं आणि लेखकांबद्दल जागृती निर्माण करणं मराठी माध्यमांना सहज शक्य आहे.

मराठी लेखनाला आलेली मरगळ, हरवलेले लेखक आणि त्यांचं लिखाण, वाचकांची उदासीनता आणि माध्यमांचं दुर्लक्ष, अशा अनेक गोष्टींच्या वावटळीत अडकलेलं मराठी लेखनाचं विश्व लेखक, वाचक, प्रकाशक, वितरक, माध्यमं अशा कडयांना मजबूत केल्याखेरीज चैतन्यशील होणार नाही. तरुण मराठी लेखक कुठे आहेत, याचं उत्तर शोधण्याची आता खरंच वेळ आली आहे.

No comments:

Post a Comment