Wednesday, 22 January 2014

अदभुत ओमान

अदभुत ओमान


त्याच त्या ठिकाणांना आणि देशांना भेट देण्याची इच्छा नसेल आणि किफायतशीर बजेटमध्ये नवीन स्थळी पर्यटनासाठी जाण्याचा तुमचा विचार असेल तर ओमान हा उत्तम पर्याय ठरू शकतो.



पर्यटनासाठी परदेशवारी म्हणजे अमेरिका, युरोपियन देश किंवा फार तर ऑस्ट्रेलिया असं आपल्याकडचं पक्क समीकरण. शॉपिंगसाठी पर्यटन करायचं तर दुबई आहेच. त्यामुळे आखाती देशांमध्ये जाण्याचा विचार झालाच तरी दुबईच्या पुढे काही आपलं विमान सरकत नाही. पण आता दुबईच्या आसपासचे इतर देशही बाह्या सरसावून पर्यटन व्यवसायात उतरले आहेत आणि त्यांना विशेष ओढ आहे ती भारतीय पर्यटकांची. या देशांच्या यादीत सर्वात पुढे आहे ‘ओमान’. दुबईपासूनच नाही तर मुंबईपासूनही अतिशय जवळच्या अंतरावर असलेला हा अरेबियन देश अगदी दोन-तीन वर्षापूर्वीपर्यंत पर्यटकांसाठी ‘सिक्रेट डेस्टिनेशन’ होता. परंतु २०१०नंतर ओमान टुरिझमने भारतात मोठया प्रमाणावर ओमानचा प्रचार सुरू केला.
परिणामी तिथल्या पर्यटकांमध्ये आता भारतीयांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसून येतेय. खरं तर ओमानच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ ६० टक्के लोक भारतीय असून ते नोकरीच्या निमित्ताने तिथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे भारतातून ओमानचा प्रवास करणा-यांमध्ये नोकरी-व्यवसायासाठी जाणारे आणि त्यांना भेटायला जाणारे, यांचंच प्रमाण आजवर अधिक होतं, पण आता ओमान पर्यटनाच्या दृष्टीनेही सज्ज झालं आहे. नुकतंच ओमान पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने ‘बालाजी टेलिफिल्म्सच्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ ह्या हिंदी सिनेमाचं चित्रीकरण ओमानमध्ये पार पडलं. या सिनेमातील ओमानमध्ये चित्रित केलेली दृश्यं भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा फायदा होईल, असं ओमान पर्यटन मंत्रालयाला वाटत आहे. आणखी काही भारतीय चित्रपट निर्मात्यांसोबत अशा प्रकारचे करार करण्यासाठी ते उत्सुक आहेत.
भारतीय विशेषत: मुंबईतील पर्यटकांसाठी ओमानचा प्रवास निव्वळ दोन तासांचा आणि थेट आहे. त्यामुळे कुठेही विमान बदलून, थांबून प्रवास करावा लागत नाही आणि खर्चही वाचतो. तिकिटांचे दरही देशांतर्गत विमानांच्या तिकीटदरांहून केवळ दोन-तीन हजार रुपये एवढेच अधिक आहेत.
ओमानमध्ये निसर्गदत्त सौंदर्य लाभलेली आणि मानवी कलात्मकतेचा आविष्कार असलेली बरीच प्रेक्षणीय स्थळं आहेत. मुळात बाहेर फिरण्याची आवड असलेल्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. म्हणजेच इथे मॉल्स, म्युझियम्स अशी बंदिस्त ठिकाणं पाहण्यापेक्षा इथले सुंदर समुद्रकिनारे, पर्वतरांगा, मधाळ रंगांची वाळवंटं, भव्य आणि नेटके राजवाडे अशा जागा फिरण्यात जास्त मजा आहे. ओमानची राजधानी असलेलं मस्कत हे शहर जितकं सर्वसमावेशक आहे, तितकीच इथली छोटी-छोटी ठिकाणं आपला इतिहास आणि आपल्या इस्लामी सभ्यता आणि परंपरांच्या घट्ट पायावर उभी राहिलेली दिसतात. इथल्या राजवाडयांच्या भिंती आणि अतिभव्य मशिदींच्या अंतर्गत रचनेतील कलाकुसर इथल्या लोकांच्या सौंदर्यप्रियतेची आणि शालीनतेची प्रतीकं आहेत. इथल्या ‘सुलतान काबूस’च्या भव्य मशिदीत एकाच वेळी २० हजार जण प्रार्थना करू शकतात. या मशिदीचं वैशिष्टय असलेला जगातला सर्वात मोठा ७० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद, १७०० गाठी असलेला पर्शियन गालिचा तब्बल २१ टनांचा असून, सहाशे बायकांनी चार वर्ष विणून तो तयार केला आहे. जुन्या मस्कतमधला सुलतानचा राजवाडा, ‘अल-जलाली’ आणि ‘अल-मिरानी’ हे किल्ले ओमानच्या श्रीमंतीचे वारसदार भासतात. ‘ओमानी हेरिटेज गॅलरी’ आणि ‘बेट मुझना गॅलरी’मध्ये खास ओमानी वस्तू पाहता आणि विकत घेता येतात. या वस्तू थोडया महाग असतात, पण ओमानी हस्तकला संग्रही ठेवण्याची हीच एकमेव संधी असते. सुगंधाची आवड असणा-यांसाठी तर ‘एमॉग’ या जगप्रसिद्ध आणि महागडया अत्तराच्या कारखान्याला भेट देणं ही पर्वणी ठरते. इथला धूपही विशेष प्रसिद्ध आहे.
इतिहासाची आवड असलेल्यांनी ‘अल-हमरा’ या ४०० वर्ष जुन्या गावाला नक्की भेट द्यायला हवी. इथल्या सर्वोच्च ‘जबल शाम्स’ या पर्वतावरून जगातल्या सर्वात मोठया गुहांपैकी एक असलेल्या ‘अल-हूटा’ या गुहेला भेट देता येते. ‘अल-जलाली’ आणि ‘अल-मिरानी’सोबतच ‘बहाला’, ‘फिकाईन’, ‘मुत्राह’, ‘नखल’, ‘निजवा’, ‘सोहर’ आणि ‘रूस्ताक’ असे किल्ले ओमानमधील अप्रतिम पुरातन स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकी कौशल्यांचे आरसे आहेत. निसर्गाच्या जवळ जाण्याची आवड असणा-यांना इथली समुद्रसृष्टी खूप जवळून अनुभवता येते. त्याचप्रमाणे इथल्या वाळवंटांत आणि कडेकपा-यांमध्ये साहसी खेळांचा थरारही अनुभवता येतो.
इथलं निसर्गसौंदर्य, लोकांच्या वागण्यातली अदब, आपलेपणा आणि अवतीभवती भरपूर भारतीय माणसांचा वावर, यामुळे आपण आपसूकच या देशाशी जोडले जातो. राहण्याची उत्तम सोय करण्याची जबाबदारी अनेक पंचतारांकित प्रसिद्ध हॉटेल्सनी उचलली असली तरी थंडगार रात्री मनमोहक वाळवंटात तंबू ठोकून निरभ्र आकाशातल्या चांदण्या न्याहाळणं हा संपूर्ण ओमान भेटीचा उच्चतम क्षण ठरतो.
सभ्यता आणि शालीनतेचा देश असलेल्या ओमानमध्ये फिरताना आपण मात्र अतिउत्साहात तिथल्या वास्तूंचा आणि लोकांचा अपमान करणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कुटुंबासोबतओमान यात्रा उत्तम पर्याय आहे, पण हनिमूनर्ससाठी नाही. इथल्या स्थानिक सभ्यतेनुसार स्त्री-पुरुषांनी उघड उघड लगट करण्यास मनाई आहे. स्त्रियांनी बाहेर फिरताना एखादी शाल किंवा स्कार्फ सोबत ठेवावा, कारण तिथल्या मशिदी आणि इतर पवित्र वास्तूंमध्ये प्रवेश करताना स्त्रियांनी डोके झाकण्याची पद्धत आहे. तसंच पुरुषांनीही पूर्ण लांबीची विजार घातलेली उत्तम.
मद्यपान इथे वज्र्य मानलं जात असलं तरी काही ठरावीक उपाहारगृहांमध्ये अधिकृतरीत्या मद्यविक्री केली जाते. पण मद्यपानापेक्षा तिथलं चवीने थोडं कडवट असलेलं ‘कावा’ हे आपल्या चहासारखं पेय, ‘लोखेमत’ या गोडसर पदार्थासोबत चाखण्यात वेगळीच मजा आहे. सणासुदीच्या वेळी ‘शुवाह’ हा आणखी अनोखा पदार्थ चाखायला मिळतो. हा बनवण्यासाठी मटणाचे तुकडे, मसाले आणि इतर जिन्नस टाकून ते जवळजवळ दोन दिवस जमिनीखाली मातीच्या भांडयात शिजवले जातात.
सार्वजनिक स्वच्छतागृहांची शहरात आणि शहराबाहेर तशी अजूनही फारशी उपलब्धता नाही, त्यामुळे बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी. उन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान प्रचंड वाढून कधीतरी पन्नासपेक्षा अधिक अंश सेल्सिअसपर्यंतही पोहोचतं. पण सप्टेंबर ते एप्रिल हा ओमानला भेट देण्यासाठी उत्तम आणि योग्य कालावधी समजला जातो.

ओमानमधला आगळावेगळा निसर्ग आणि एका वेगळ्या संस्कृतीचा अनुभव ही सहल आल्हाददायक बनवतो यात शंकाच नाही. तर यंदा ओमानच्या अदबशीर पाहुणचाराचा आनंद अनुभवण्यासाठी थोडी वेगळी वाट निवडायला हरकत नाही.

तृप्ती एकबोटे-देवरुखकर

No comments:

Post a Comment